टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका खेळात पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तो खेळ आहे थाळीफेक. भारताची महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने या खेळात अंतिम फेरी गाठली आहे.
कमलप्रीत कौर हिने तिन्ही प्रयत्नांमध्ये 60 मीटरच्या वरची कामगिरी करत, ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. दुसरीकडे याच खेळात भारतासाठी दुसरी आशा असलेली सीमा पुनिया मात्र सोळाव्या स्थानावर राहिली. यामुळे तिला अंतिम फेरी गाठता आले नाही. दरम्यान, पहिल्या 12 जणांना अंतिम फेरीसाठी स्थान मिळते.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज कमलप्रीत कौर हिने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा 63.97 मीटर अशी कामगिरी नोंदवली. यासह ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.
कमलप्रीत कौरबद्दल थोडसं....
कमलप्रीत कौर ही पंजाबच्या श्री मुख्तार साहिब जिल्ह्यातील कबरवाला गावची आहे. तिने लहानपणापासूनच थाळीफेक सरावाला सुरुवात केली होती. शाळेत असताना तिने राज्य स्तरीय थाळीफेक स्पर्धेत भाग घेतला होता. पण ती या स्पर्धेत पदक जिंकू शकली नाही. मात्र तिने यात चौथे स्थान पटकावत आपली छाप सोडली.
कमलप्रीत कौरचा राष्ट्रीय विक्रम -
टोकियो ऑलिम्पिकसाठी या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये पात्रता फेरी स्पर्धा खेळवण्यात आली. यामध्ये कमलप्रीत कौरने राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तिने ६५ मीटर लांब थाळी फेकली. जून महिन्यात तिने तिचाच विक्रम मोडला. त्यावेळी तिने ६६.५९ मीटर लांब थाळी फेकली.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक : भारतीय पुरुष हॉकी संघाची जपानवर 5-3 ने मात
हेही वाचा - Live Tokyo Olympics : शानदार, जबदरस्त! थाळीफेकपटू कमलप्रीत अंतिम फेरीत