टोकियो - कुस्तीपटू रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. 57 किलो वजनी गटात रवी कुमार दहिया याने कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेसोस उरबानो याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रवी कुमार दहिया याने हा सामना 13-2 अशा फरकाने जिंकला.
पहिल्या दोन मिनिटामध्ये दोन्ही कुस्तीपटूंमध्ये चांगली लढत पाहायला मिळली. रवी दहियाने दोन गुण घेतले. तर उरबानो याने रिवर्स टेकडाउनच्या माध्यमातून गुणांची कमाई केली. यानंतर रवी दहियाने शानदार वापसी करत दुसऱ्या पीरियडमध्ये एकूण 10 गुण घेतले.
रवी कुमार दहिया याने जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. रवीने उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्व विजेता आणि 2017 चा आशियाई चॅम्पियन जपानचा यूकी ताकाहाशी यांचा पराभव केला. रवीने हा सामना 6-1 ने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. पण त्याला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला.
दरम्यान, 62 किलो वजनी गटात भारताची महिला कुस्तीपटू सोनम मलिकचे आव्हान संपुष्टात आले. तिला मंगोलियाच्या खेळाडूंने पराभूत केले.
हेही वाचा - Tokyo Olympic : टोकियोत इतिहास घडविणाऱ्या हॉकीतील 16 रणरागिणी!
हेही वाचा - Tokyo Olympics: सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारी ही मुलगी आहे तरी कोण?