औरंगाबाद - नवीन वर्षात अनेक लोक विविध संकल्प घेऊन प्रवास करण्याचे स्वप्न बाळगतात. मात्र, औरंगाबादमधील शाळेतील एका शिक्षकाने नवीन वर्षाची सुरुवात अनोख्या पद्धतीने केली. या अवलियाने कडाक्याच्या थंडीत तब्बल २० तास पोहण्याचा अनोखा कारनामा केला. नवीन वर्षाचे औचित्त्य साधून मिशन २०२० अंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा - VIDEO : 'अग्निसुरक्षारक्षक' म्हणून मदतीला धावला ग्लेन मॅक्सवेल!
राजेश पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे. पाटील हे वैजापूर तालुक्यातील आंबेलोहळ जिल्हा परिषद शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राजेश यांनी याआधी १३ तास पोहण्याचा विक्रम केला होता. नवीन वर्षात पर्यावरण बचाव संदेश देत त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीस काढला आहे.
जिल्हा परिषदच्या शाळेत क्रीडा शिक्षक असलेले राजेश पाटील गेल्या १५ वर्षांपासून जलतरण करतात. रोज चार तास सराव हा त्यांचा सवयीचा भाग झाला आहे. पर्यावरणाची आवड असलेल्या राजेश यांनी 'पर्यावरण वाचवा' ही मोहीम गेल्या काही वर्षात हाती घेतली. जलतरणाच्या माध्यमातून सर्वांना त्यांनी 'पर्यावरण बचाव, जग बचाव' हा संदेश दिला.
नवीन वर्षाचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्हा जलतरण संघटनेच्या परवानगीने एमजीएम जलतरण तलावात सलग २० तास पोहण्याचा विक्रम राजेश यांनी नोंदवला. ५० मीटरच्या ४९४ फेऱ्या पूर्ण करत २० तासात २४.७ किलोमीटर पोहून त्यांनी हा विक्रम केला आहे. नव्या पिढीला ऑक्सिजन मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले. जिल्हा जलतरण संघटनेने देखील त्यांच्या उपक्रमाला साथ दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांना एक वृक्ष देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दिलेल्या वृक्षापैकी दहा झाड जरी जगली तर उद्देश सफल होईल, असा विश्वास जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने व्यक्त केला गेला आहे.