नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने पुढील चार वर्षांसाठी 'खेलो इंडिया' योजनेंतर्गत 500 खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत 2020-21 या आर्थिक वर्षापासून लागू होईल.
या योजनेत अकादमी अनेक स्केलवर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या जातील. या अकादमीमध्ये खेळणारे खेळाडू, प्रशिक्षकांच्या कामगिरीचा स्तर यासारख्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे.
खासगी अकादमींना प्रेरणा देण्याचा प्रयत्न
या योजनेंतर्गत साई आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) एकत्र काम करतील. साई एनएसएफशी चर्चा करतील आणि अकादमींना श्रेणींमध्ये विभागण्याचे काम करतील. देशाच्या विविध भागात अनेक लहान-मोठ्या अकादमी आहेत. ज्या खेळाडूंची ओळख निर्माण करण्याची आणि प्रशिक्षण देण्याचे मोठे काम करीत आहेत. या योजनेतून सर्व अकादमी विशेषत: खासगी अकादमींना प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून अनेक खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होऊ शकेल, असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले.