नवी दिल्ली - कोरोनाचा प्रभाव पाहता नजीकच्या काळात भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणार नाही. प्रेक्षकांशिवाय स्टेडियमवरील उपक्रमांचा आनंद कसा घ्यावा हे चाहत्यांना शिकावे लागेल, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले.
किरेन रिजिजू यांच्या वक्तव्याचा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) वर सर्वाधिक होईल. ऑस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तहकूब झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचार आहे.
रिजिजू म्हणाले, ''क्रीडा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही बर्याच दिवसांपासून काम करत होतो पण त्यापूर्वी आम्हाला सराव आणि प्रशिक्षणाबद्दल विचार करावा लागेल. आम्ही त्वरित स्पर्धा सुरू करण्याच्या स्थितीत नाही. देशातील कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्याचा सरकारला विशेषाधिकार आहे.''
कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. याप्रकरणी रिजिजू म्हणाले, ''भारत सरकार परिस्थिती बघून निर्णय घेईल. आरोग्याला धोका पत्करून आपण खेळांचे आयोजन करू शकत नाही. पण मला खात्री आहे की यावर्षी आमच्यात काही स्पर्धा होतील.''