नवी दिल्ली - भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडण्यास गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. क्रीडाविषयक उपक्रम स्थगित झाल्यामुळे ही मैदाने मार्चच्या मध्यापासून बंद होती. मात्र, मंत्रालयाच्या निर्णयानंतर खेळाडूंना सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडण्यास परवानगी दिली असली तरी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊन सोमवारी संपु्ष्टात आले आणि चौथा टप्पा 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात 90 हजांरांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात सुमारे 3 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एप्रिल महिन्यात अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही भारताची सर्वात मोठी स्पर्धा आहे. रविवारी मंत्रालयाचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल सुरू होण्याची शक्यता नसल्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी निर्बंध अजूनही लागू आहेत.