सोलापूर - पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी आणि कुमार केसरी या स्पर्धांसाठी निवड चाचणी स्पर्धा सांगोल्यातील चिकमहुद येथे पार पडली. यात माती विभागातून माऊली जमदाडे, तर मॅट विभागातून अक्षय मंगवडे यांची अंतिम निवड झाली असून दोघेही सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
निवड चाचणी स्पर्धेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मल्लांनी हजेरी लावली होती. सर्वप्रथम १० विविध वजनी गटातून नोंदणी घेण्यात आली. त्यानंतर माती विभाग, मॅट विभाग तसेच कुमार केसरी गटानुसार ५७ ते १२० किलो वजनी गटात सहभागी मल्लांची विभागणी करण्यात आली आणि त्यांच्या गटानुसार लढती लावण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव भरत मेकाले यांच्या उपस्थितीत, परिषदेच्या मान्यताप्राप्त पंचाच्या देखरेखीखाली, ही चाचणी स्पर्धा पार पडली. उत्तम व तंत्रशुद्ध डावपेच तसेच गुणांनुसार, सर्व लढतीतील निकाल देण्यात आले.
मल्लाची कोणत्याही तक्रार असल्यास नियमावलीचे पालन करत त्याचे तात्काळ निरासन करण्यात आल्याने, सहभागी मल्ल व वस्ताद यांनी समाधान व्यक्त केले.
सांगोला तालुक्याचे नूतन आमदार अॅड. शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते चाचणी स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. यावेळी चिकमहुद सरपंच रवींद्र बापू कदम, उपसरपंच सुरेश कदम, पैलवान दादासाहेब जाधव,पैलवान प्रमोद हुबाले, गावातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
चाचणी स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भरत मेकाले, उमेश सुळ, नामदेव बडरे, रावसाहेब मगर, सर्जेराव चवरे, विलास कंडरे यांच्या उपस्थित पार पडले.