रायगड - 'चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जे खेळाडू खेळले नाहीत, त्यांची ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. जे खेळाडू निवड चाचणी स्पर्धेत खेळले त्यांची निवड महाराष्ट्रच्या संघात करण्यात आली आहे', अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाही अॅड.आस्वाद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचा - तीन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या जलतरणपटूवर ८ वर्षांची बंदी
६७ वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे २ ते ६ मार्च या कालावधीत खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांचे सराव शिबीर अलिबाग तालुक्यातील आवास येथे आयोजित करण्यात आले होते. या सराव शिबीराला अॅड. आस्वाद पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'प्रो-कबड्डी स्पर्धेत खेळल्यामुळे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली नाही हा आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे. नाशिक येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या कालावधीत प्रो-कबड्डी स्पर्धा सुरू होती. त्या स्पर्धेत खेळाडू खेळत होते. त्यामुळे निवड चाचणीत हे खेळाडू खेळले नाही हे मान्य आहे. त्यावेळी निवड चाचणीत न खेळता देखील या वरिष्ठ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली होती. परंतु चिपळूण येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या वेळी प्रो- कबड्डी स्पर्धा नव्हती तरी देखील हे वरिष्ठ खेळाडू या निवड स्पर्धेत खेळले नाहीत. जे खेळाडू राज्य निवड चाचणीत खेळले नाहीत त्यांची निवड महाराष्ट्रच्या संघात केली नाही', असे अॅड. आस्वाद पाटील यांनी स्पष्ट केले.
जे खेळाडू चिपळूण येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत खेळले त्यांच्यातूनच महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला आहे. यंदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात नवोदित खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू चांगले खेळतील. या तरुण खेळाडूंना घेऊन संघ बांधणी केली जाणार आहे. या खेळाडूंसाठी वर्षातून तीन वेळा सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याचे परिणाम आता दिसले नाहीत तरी भविष्यात चांगले दिसतील, असे अॅड. पाटील म्हणाले. 'महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगला खेळ करावा. खेळाबरोबरच शिस्त पाळावी. आपल्या वर्तनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी खेळाडूंनी घेतली पहिजे. या सूचना खेळाडूंना देण्यात आल्या आहेत', असे अॅड. पाटील यांनी सांगितले.