बुडापेस्ट - हंगेरीच्या बुडापेस्ट येथे रंगलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद (२३ वर्षाखालील ) स्पर्धेत भारताच्या रवींदरला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. ६१ किलो वजनी गटात रवींदरला किर्गिस्तानच्या उल्कबेक झोल्डोश्बेकोव्हने ५-३ च्या फरकाने नमवले. दरम्यान, भारताचे या स्पर्धेतील हे पहिले पदक आहे.
अंतिम सामन्यात भारतीय रवींदरने विश्रांतीपर्यंत आघाडी घेत आपले वर्चस्व राखले होते. पण विश्रांतीनंतर उल्कबेक याने सामन्याचे चित्र पालटवले. त्याने मोक्याच्या क्षणी भक्कम खेळ करत सामना जिंकला. दरम्यान, उल्कबेकने २०१८ साली वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे.
रवींदरने अंतिम फेरीत धडक मारल्याने, भारतीयांच्या सुवर्ण पदकाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, उल्कबेकच्या झंझावतासमोर रवींदरला ५-३ च्या फरकाने पराभूत व्हावे लागले. या आधी रविंदरने वरिष्ठ युरोपियन चॅम्पियन आर्मेनियाच्या आर्सेन हारुतयुनानला ४-३ अशी मात देत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, रवींदरने २०१६ साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ साली कॅडेट आशिया अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक आहे. तसेच स्पर्धा इतिहासात भारताचे हे पाचवे पदक ठरले.
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत याआधी बजरंग पुनिया (६५ किलो), विनोद कुमार (७०) आणि महिला कुस्तीपटू रितू फोगाट (४८) आणि रवी दाहिया (५७) यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकले आहे.