पालघर - जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू मनाली जाधवने हरियाणाच्या भिवानी येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मनालीने मिळवलेल्या यशाचे जिल्ह्याभरातून कौतूक होत आहे.
मनाली ही शालेय जीवनापासून कुस्ती खेळात तरबेज आहे. मूळची भिवंडीच्या दुगाड फाटा येथील रहिवाशी असलेल्या मनालीने जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. आता सध्या ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली मोहर उठवण्यासाठी कसून सराव करत आहे.
मनालीने यापूर्वी ३० जानेवारी २०१८ ला वर्ध्यामध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद पटकावले होते. तसेच तिने २०१८ मध्येच यवतमाळ येथे झालेल्या स्पर्धेत ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. महत्वाची बाब म्हणजे मनालीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले आहे.
मनालीची आई एका पतपेढीत नोकरी करतात. घरची परिस्थितीच बेताचीच. यामुळे कौशल्य असलेल्या मनालीचे पालकत्व झाडपोली येथील जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी स्वीकारले. सध्या तिचा संपूर्ण खर्च अकॅडमी करते. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत मनालीने कांस्य पदक जिंकल्याने, तिचे अकॅडमीकडून अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय ज्यूनियर जुडो स्पर्धेला सुरुवात
हेही वाचा - 39 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे पुण्यात आयोजन