लंडन - कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (सीजीएफ) 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी ही स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु, आता ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.
सीजीएफ आणि बर्मिंगहॅम 2022 आयोजन समितीची ही संयुक्त घोषणा कोरोनामुळे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वेळापत्रकांमधील बदलांमुळे झाली आहे, असे सीजीएफने एका निवेदनात म्हटले आहे.
युईएफए महिला फुटबॉल स्पर्धेच्या संभाव्य उपांत्य-सामन्याच्या तारखेचा संघर्ष टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. बर्मिंगहॅम-2022 ही क्रीडा इतिहासातील अशी स्पर्धा असेल ज्यात महिलांनी जास्त पदके जिंकलेली असतील.
बर्मिंगहॅम-2022 चे अध्यक्ष जॉन क्रॅबट्री म्हणाले, "कोरोनाचा पुढील काही वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वेळापत्रकावर परिणाम होईल. गोष्टी पुन्हा करण्याची गरज आहे. या बदलांचा बर्मिंगहॅम-2022, खेळाडू, आमचे दर्शक आणि टीव्हीवर पाहणारे लोक, आमचे भागीदार यांच्यावर काय परिणाम होईल हे आम्ही इतर संस्थांसोबत जाणण्याचा प्रयत्न केला आहे."