नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासह कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनियाला हरियाणा सरकारने बक्षीस जाहीर केले आहे. नीरज चोप्राला 6 कोटी रुपये तर बजरंग पुनियाला अडीच कोटींच्या बक्षिसाची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.
नीरजला सहा कोटींसह वर्ग एक श्रेणीची नोकरी
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राला 6 कोटी रुपये, वर्ग एक श्रेणीतील नोकरी आणि 50 टक्के सवलतीत भूखंड देण्याची घोषणा केली आहे. पंचकुला येथे हरियाणा सरकारकडून ऍथलिटससाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी केली जात आहे. नीरजची इच्छा असेल तर याचे प्रमुखपद त्याला दिले जाईल असे खट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बजरंग पुनियाला अडीच कोटी आणि सरकारी नोकरी
याशिवाय बजरंग पुनियालाही अडीच कोटी रुपये, सरकारी नोकरी आणि 50 टक्के सवलतीत भूखंड देण्याची घोषणा खट्टर यांनी केली आहे. पुनियाचे गाव खुदान इथे एक इनडोअर स्टेडियमही उभारले जाईल असेही त्यांनी सांगितले. बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक मिळविले आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! नीरज चोप्राने इतिहास रचला, टोकियोत जिंकलं सुवर्ण पदक