नवी दिल्ली - 'कोबी ब्रायंट' हे नाव भारतातील अधिकतम लोकांना फारसं माहित नसलं, तरी, इथल्या तमाम बास्केटबॉल चाहत्यांसाठी हे नाव मोठं होतं. सकाळी त्याच्या निधनाच्या बातमीनं एखाद्या 'तीव्र रिश्टर स्केल'च्या भूकंपासारखं इंटरनेटही हादरलं. त्याच्या मृत्यूनंतर, कोबीचं कधीही नाव न ऐकलेल्या लोकांनीही त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेले अनेक कारनामे, विक्रम, त्याचे बास्केटबॉल आणि मुलीप्रति असलेलं प्रेम या सर्व गोष्टींचा शोध लागल्यानंतर, एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे तो मैदानावर खेळत असलेला 'फेड-अवे' फटका (fadeaway shot).
'फेड-अवे' फटका म्हणजे नेमकं काय?
'फेड-अवे' (fadeaway shot) हा बास्केटबॉल खेळात खेळला जाणारा एक कठीण फटका आहे. यामध्ये उंच उडी मारून चेंडू जाळ्यात फेकता येतो. हा फटका ब्लॉक करणं आव्हानात्मक आहे. कारण डिफेंडर आणि हा फटका खेळणारा खेळाडू यांच्यात जागा निर्माण होते. सुरूवातीला बास्केटच्या विरूद्ध दिशेला तोंड करून संधी निर्माण झाल्यास उंच उडी घेऊन हा फटका खेळला जातो. हा फटका खेळणं अजूनही अनेक बास्केटबॉलपटूंना अवघड जातं कारण यात अधिक ताकद आणि अचूकता आवश्यक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
फेड-अवेच्या फटक्यामध्ये कोबी नेहमीच अचूक राहिला. आजही इंटरनेटवर हा फटका 'सर्च' केला, की कोबीचा फोटो पहिला येतो. अनेक बास्केटबॉलपटू हा फटका शिकण्यासाठी कोबी ब्रायंटच्या व्हिडिओचा आधार घेतात. या फटक्यानं त्यानं अनेक सामन्यांना कलाटणी दिली आहे. कोबीच्या निधनानं हा फटकाही निवृत्त होणार का? अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. जोपर्यंत कोबीएवढा पारंगत असलेला बास्केटबॉलपटू या खेळात उडी घेत नाही तोपर्यंत या फटक्याचा 'कॉपीराईट' कोबीच्याच नावावर राहील.