नवी दिल्ली - बास्केटबॉल दिग्गज मायकेल जॉर्डन यांच्या प्रदर्शनीय सामन्यातील शूजचा लिलाव झाला आहे. हे शूज ५ लाख ६० हजार डॉलर्स म्हणजेच ४ कोटी ६० लाखांना विकले गेले आहेत. क्रिस्टी ऑक्शनने गुरूवारी ही माहिती दिली. या शूजला मिळालेली किंमत ही विक्रमी असल्याचे क्रिस्टी ऑक्शनने सांगितले.
महान खेळाडू मायकेल जॉर्डन यांच्या कारकिर्दीत शिकागो बुल्सचा संघ यशाच्या शिखरावर होता. १९९५मध्ये जॉर्डन यांनी सर्व बास्केटबॉल चाहत्यांना वेड लावले. त्या काळात त्यांनी एक प्रदर्शनीय सामना खेळला होता. या सामन्यात जॉर्डन यांनी बॉलला इतका जोरदार फटका मारला, की कोर्टाच्या पाठी असलेली काच फुटली होती. याच सामन्यात त्यांनी वापरलेल्या शूजला एक खरेदीदार सापडला आहे. हा सामना इटलीत खेळला गेला.
जॉर्डन यांनी १३.५ आकाराचे हे शूज परिधान करून या सामन्यात एकूण ३० गुण मिळवले. जॉर्डन हे सहा वेळा एनबीए चॅम्पियन आहेत. १९९०च्या दशकात त्यांनी शिकागो बुल्सचे नेतृत्व केले. जॉर्डन यांना बास्केटबॉलमध्ये हॉल ऑफ फेमदेखील मिळाला आहे.