स्पीलबर्ग - सहा वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन आणि मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने रविवारी रेड बुल रिंग येथे स्टायरियन ग्रँड प्रिक्स आपल्या नावावर केली. यावर्षीचा हॅमिल्टनचा हा पहिला विजय आहे. पहिल्या फेरीत फेरारी संघाचा चालक सेबॅस्टियन व्हेटेल आणि चार्ल्स लेक्लेरक शर्यतीतून बाहेर पडले. हॅमिल्टनचा साथीदार मर्सिडीज चालक वाल्टेरी बोटास दुसर्या स्थानावर तर रेड बुलचा ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेनने तिसरा क्रमांक पटकावला.
हॅमिल्टनने शर्यतीनंतर सांगितले, "संघाने त्यांच्या रणनीतीने एक अद्भुत कामगिरी केली. प्रथम स्थान मिळवल्यानंतर मी खूप आनंदी आहे. ही एक चांगली चाल आहे. मी सतत शर्यतीत असतो. ही प्रक्रिया मी संपूर्ण हंगामात चालू ठेवू शकतो."
बोटास म्हणाला, "लुईसची चांगली सुरुवात होती आणि त्याने शर्यतीवर नियंत्रण ठेवले. माझ्यासाठी चौथ्या क्रमांकापासून सुरुवात करणे नुकसानकारक होते. त्यामुळे दुसरे स्थानही वाईट नाही. मी हंगेरियन शर्यतीबद्दल उत्साहित आहे."
ऑस्ट्रिया फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद बोटासकडे -
फिनलँडच्या वाल्टेरी बोटासने नुकतेच ऑस्ट्रिया फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले आहे. बोटासने दिमाखदार पद्धतीने मर्सिडिजसाठी फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत जिंकली. तर, पाच सेकंदाच्या 'टाईम पेनल्टी'मुळे या स्पर्धेत विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.