मुंबई - महाराष्ट्राचा लाडका मल्ल आणि राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राहुल भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु काकासाहेब पवार यांचा जावई होणार आहे. कझाकिस्तान येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुलने कांस्यपदक जिंकले होते.
हेही वाचा - राष्ट्रकुल ज्युडो चॅम्पियनशिप : मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ठरली सुपरस्टार, जिंकले सुवर्णपदक
अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या काकासाहेब पवार हिच्याशी राहुल आवारेचा विवाह नक्की करण्यात आला आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या ९ ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. काकासाहेब पवार हे राहुल आवारे याचे प्रशिक्षक आहेत.
पाटोद्याचा कुस्तीपटू राहुलने विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवून कुस्ती क्षेत्रात एक इतिहास रचला. सोबतच त्याने ६१ किलो वजनी गटातील जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम वर्ग नोकरी प्रदान करुन त्याच्या कारकिर्दीचा गौरव केला होता. राहुल सध्या पोलीस उपअधीक्षक (Dysp) पदाचे प्रशिक्षण घेत आहे.