पुणे - महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात आज दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. गतविजेता बाला रफिक शेख आणि दिग्गज अभिजित कटकेला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवा विजेता मिळणार असून अंतिम लढत शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. दोघेही काका पवार यांचे पठ्ठे असून दोघांनीही एकत्रित सराव केला आहे. पण या लढतीआधी दोघांनीही मैत्रीच्या ठिकाणी मैत्री अन् कुस्तीच्या ठिकाणी कुस्ती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ही लढत चुरसीची होणार, यात काही शंकाच नाही.
या सामन्याआधी बोलताना हर्षवर्धनने सांगितले, की 'विजयाबद्दल नक्की सांगू शकत नाही. कारण आम्ही दोघांनी एकत्रित सराव केला आहे. जो काही निकाल लागेल त्यावर आम्ही दोघेही खुश असणार आहोत. पण मैत्रीच्या ठिकाणी मैत्री आणि कुस्तीच्या ठिकाणी कुस्ती असणार आहे.'
दुसरीकडे शैलेशने सांगितले, की 'दोस्ती तर आहे आमची, एकत्रित खातो. एकत्रित राहतो. पण मॅटवर गेल्यावर फाईट होईल. मीही मॅटवर चांगला सराव केलेला आहे. आमच्या दोघांवर वस्ताद काका पवारांचा आशिर्वाद असणार आहे.'
लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हे दोघंही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आणि अर्जुनवीर काका पवारांचे पठ्ठे आहेत. दोघांनी आपापल्या विभागातील अंतिम फेरी जिंकल्यावर काका पवार यांना खांद्यावर उचलून घेत आखाड्यात फेरी मारली. यामुळे आता काका पवारांचे दोन शिष्य उद्या (०७ जानेवारी) पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात भिडतील आणि या स्पर्धेनंतर राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळेल.
हेही वाचा - हर्षवर्धन की शैलेश : कोण होणार यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी: गतविजेता बाला रफिक शेखसह अभिजित कटकेचे आव्हान संपुष्टात