मोग्योरोड - सहा वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने रविवारी झालेल्या हंगेरीयन ग्रँड प्रिक्स शर्यतीचे जेतेपद जिंकले. या विजयामुळे हॅमिल्टनने दिग्गज मायकल शुमाकरच्या विक्रमाची बरोबरी केली. आता शुमाकर आणि हॅमिल्टन यांच्या नावावर एका सर्किटवर सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम आहे.
हंगेरीयन ग्रँड प्रिक्स शर्यतीचे हॅमिल्टनचे हे आठवे विजेतेपद आहे. तर शुमाकरनेही आठ वेळा ही शर्यत जिंकली आहे. हॅमिल्टनचे हे एकूण 86 वे ग्रँड प्रिक्स विजेतेपद असून तो आता शुमाकरच्या सर्वाधिक ग्रँड प्रिक्स विजेतेपदाच्या विक्रमापासून पाच विजय दूर आहे.
ही शर्यत जिंकल्यानंतर हॅमिल्टन म्हणाला, "ही माझ्या आवडत्या शर्यतींपैकी एक आहे. आमच्याकडे वेग होता आणि योग्य रणनीती होती. शेवटच्या दोन शर्यती माझ्यासाठी मजेदार राहिल्या आहेत.
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे तर हॅमिल्टनचा मर्सिडीज संघाचा सहकारी वाल्टेरी बोटासने तिसरे स्थान राखले. रेसिंग पॉईंट टीमच्या लान्स स्ट्रॉलने चौथ्या तर रेड बुलचा अॅलेक्स अल्बियन पाचव्या स्थानावर राहिला.
फेरारीचा ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेल सहाव्या तर त्याचा सहकारी चार्ल्स लॅकरेक एकही गुण मिळविण्यास अपयशी ठरला. त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. रेसिंग पॉईंट संघाचा सर्जिओ पेरेझ, रेनोचा डॅनियल रिकॅड्रे आणि हेसचा केव्हिन मॅग्नेसन या जोडीने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले.