बीड - जिल्ह्यातील परळी येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने ५ वे ग्रामीण मराठी साहित्य संम्मेलन नाथ्रा येथे होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कुस्तीभूषण' पुरस्कार जाहीर केला आहे.
नाथ्रा येथे १७ आणि १८ जानेवारीला होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे डॉ. एकनाथ मुंडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी साहित्यिक सोपान हाळमकर, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. अमर हबीब, प्रसिध्द कथाकार प्रा. भास्कर बडे, कवी प्रभाकर साळेगावकर, प्रा. मधु जामकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
परळी तालुक्यात मुरलीधर मुंडे यांनी पहिल्यांदाच तळेगाव येथे कुस्ती आखाडा सुरुवात करुन ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यांनी कुस्ती अधिवेशन आयोजित करुन कुस्तीला चालना दिली. सध्या ते परळी तालुका कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या पुरस्कारासाठी मुरलीधर मुंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.