नवी दिल्ली - भारतात मार्चच्या मध्यापासून बंद असलेले क्रीडा उपक्रम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होतील, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केला आहे. रिजीजू यांनी नुकत्याच राष्ट्रकुल देशांच्या फोरममध्ये भाग घेतला होता. या फोरममध्ये कोरोनानंतर भारतात खेळ सुरू करण्याची रणनीती तसेच संयुक्त क्रीडा धोरण तयार करण्यास हातभार लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
रिजीजू म्हणाले, "राष्ट्रकुल राष्ट्रांचे सदस्य या नात्याने आपण सर्व मुद्द्यांवर विशेषत: एका वेळी एकत्र उभे राहिले पाहिजे. सर्व देश पुढे जाण्यासाठी एकत्र आले आहेत. या फोरमचा भाग झाल्याने मला आनंद झाला आहे."
ते म्हणाले, "इतर देशांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते भारतासारखेच आहेत. तथापि यादरम्यान आम्ही काहीतरी वेगळे साध्य केले आहे. हा अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल."
रिजीजू म्हणाले, "सरकारने निर्बंध आणि कडक एसओपीसह काही उपक्रमांना मान्यता दिली आहे. ही मार्गदर्शक तत्वे प्रत्येक क्रीडा संघटनेने लागू करावीत. आमच्या खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले आहे. मी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडामंत्र्यांसमवेत तसेच सर्व राष्ट्रीय क्रीडा संघांशी बोललो. आपल्याला लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. मला आशा आहे की सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भारतात क्रीडा उपक्रम सुरू होतील. आम्ही वेगवेगळ्या खेळांमधील मोठे लीगसुद्धा सुरू करण्याच्या विचारात आहोत."