नवी दिल्ली - राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या भालाफेकपटू नीरज चोप्राची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने नीरजसाठी (एएफआय) नामांकन दिले आहे.
2016मध्ये नीरजने जागतिक कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, "2018मध्ये नीरज मीराबाई चानू आणि बजरंग पुनियाच्या मागे राहिला होता. मात्र, यंदा तो पुरस्कार नक्की जिंकेल असे आम्हाला वाटते."
ते म्हणाले, "2021च्या ऑलिम्पिकपूर्वी भारताच्या या नामांकित खेळाडूला हा पुरस्कार मिळाला पाहिजे. या पुरस्कारामुळे त्याला प्रेरणा मिळेल."
अर्जुन पुरस्कारासाठी एएफआयने द्युती चंद आणि पीयू चित्रा यांच्या व्यतिरिक्त ट्रिपल जम्पर अर्पिदर सिंग, धावपटू मनजित सिंग यांची शिफारस केली आहे. तर, राधाकृष्णन यांचे नाव एएफआयने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी दिले आहे.
1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारे कुलदीपसिंग भुल्लर आणि माजी धावपटू जिन्सी फिलिप यांना ध्यानचंद पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.