टोकियो - चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे आजघडीपर्यंत २६० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या दहशतीने अनेक स्पर्धेचे यजमानपद दुसऱ्या देशांना देण्यात येत आहेत. तर काही स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेवर काही परिणाम होणार नसल्याचे, जपानकडून सांगण्यात आले.
जपानच्या टोकियोमध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेवरही कोरोना व्हायरसचे सावट आहे. पण, जपानचे क्रीडा मंत्री सीको हाशीमोटो यांनी सांगितले की, 'टोकियो ऑलिम्पिकला कोरोना व्हायरसचा धोका नाही. सगळे काही नियोजित कार्यक्रमानुसार सुरळीत होईल.'
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे उपलब्ध माहितीनुसार चीनमध्ये २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा हजाराहून अधिक लोक या व्हायरसने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जपानमध्येही १७ रुग्ण कोरोना व्हायरसने बाधित असल्याचे समजते.
जपानच्या कॅबिनेट बैठकीनंतर हाशीमोटो यांनी सांगितले की, 'मला माहित आहे की कोरोना प्रश्नामुळे लोक चिंतेत आहेत. पण चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी बोलणी करत आहोत. ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत.'
हेही वाचा - सुमारे १४ फूट उंचीवर हवेत उडी मारतो हा मुलगा!..पाहा व्हिडिओ
हेही वाचा - मेरी कोमला पद्मविभूषण तर, सिंधूला पद्मभूषण