जळगाव - आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश मिळवणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 3 लाख रुपये प्रदान केले जातात. जळगाव जिल्ह्यात असे 20 ते 22 खेळाडू आहेत. परंतु, या खेळाडूंना अद्यापपर्यंत प्रस्ताव पाठवूनही गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रश्नी जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून हा विषय दुर्लक्षित राहिला आहे.
हेही वाचा - सावदा : अवघ्या महिन्याभरात परदेशी कुटुंबातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अनेक सॉफ्टबॉल खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. सर्वच वयोगटातील राष्ट्रीय संघात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग असतो. जागतिक वरिष्ठ गट विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धा, आशियाई वरिष्ठ गट सॉफ्टबॉल स्पर्धा, आशियाई विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा, 17 वर्षांच्या खालील आशियाई व जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धा, 19 वर्षांच्या खालील आशियाई व जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धा, 12 वर्षांखालील सॉफ्टबॉल स्पर्धांमध्ये अनेक महाराष्ट्रातील खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापैकी काही खेळाडूंना राज्य शासनाकडून गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. शिष्यवृत्तीची 3 लाख रुपयांची आर्थिक रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. परंतु, आजही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू या शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य शासनाकडून दुजाभाव?
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. मात्र, ठराविक खेळाडूंना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली आहे. अशा परिस्थितीत प्रस्ताव पाठवूनही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत नसल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या खेळाडूंच्या मनात असंतोषाची भावना वाढली आहे. शिष्यवृत्ती वाटप करताना राज्य शासनाकडून दुजाभाव तर केला जात नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता कोरोनाच्या काळात अनेक खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सराव करणे, नवीन साहित्य खरेदी करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या वाटपाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी खेळाडूंच्या वतीने केली जात आहे.
क्रीडा संघटनांच्या पाठपुराव्याला यश कधी येणार?
या विषयासंदर्भात जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रशांत जगताप 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव कमावणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडूंना राज्य शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ प्रदान करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक खेळाडू या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याबाबत आम्ही सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. परंतु, अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. क्रीडा मंत्र्यांकडेही हा प्रश्न अनेकदा मांडण्यात आलेला आहे. पण आश्वासनापलीकडे काहीही झालेले नाही. शासनाने ज्या खेळाडूंचे प्रस्ताव आले आहेत, त्यांची छाननी करून पात्र खेळाडूंना लाभ दिला पाहिजे, असे मत जगताप यांनी मांडले.
गोरगरीब खेळाडूंनी साहित्य कुठून आणायचे?
आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत पदक मिळवणारा खेळाडू अक्षय येवले म्हणाला की, अनेक वर्षांपासून प्रस्ताव पाठवून देखील शासनाकडून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत. माझ्यासारखे अनेक खेळाडू लाभापासून वंचित आहेत. आम्ही गोरगरीब खेळाडूंनी महागडे साहित्य कसे खरेदी करायचे? एकीकडे मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमधील खेळाडूंना ही शिष्यवृत्ती लगेच मिळते. मग खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील खेळाडूंवर अन्याय का? शासनाने आम्हालाही लाभ दिला पाहिजे, अशी मागणी येवले याने केली.
थेट नियुक्तीचाही प्रश्न प्रलंबितच-
ऑलिम्पिक तसेच राष्ट्रकुलमध्ये मान्यता असणाऱ्या खेळ प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासनाकडून थेट शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. मात्र, राज्यातील अशा अनेक खेळाडूंना थेट शासन सेवेत नियुक्ती मिळालेली नाही. या प्रश्नाबाबत आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. अजूनही स्मरण पत्र पाठवत आहोत. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. शिष्यवृत्तीच्या प्रश्नासोबत गुणवत्ता पात्र खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्नही सुटायला हवा, असे मत जळगाव जिल्हा भाजप क्रीडा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण श्रीखंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडले.
हेही वाचा - जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; अपशकुनी समजून वडील छळ करत असल्याची मामाची तक्रार