लुसाने - स्थगित झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) 80 कोटी डॉलर्सचा खर्च उचलणार आहे. आयओसी अध्यक्ष थॉमस बाख यांनी ही माहिती दिली. ऑलिम्पिक स्पर्धा आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जातील.
बाख म्हणाले, ''ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी 80 कोटी डॉलर्स खर्च करावे लागतील, असा आमचा अंदाज आहे. यापैकी 65 कोटी डॉलर्स या स्पर्धेच्या आयोजनासाठी लागतील. तर उर्वरित 15 कोटी डॉलर्स आंतरराष्ट्रीय महासंघ आणि राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी (एनओसी) खर्च करण्यात येणार आहेत.''
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1916, 1940 आणि 1944 मध्ये ही मानाची स्पर्धा जागतिक महायुद्धांमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असली तरी, या स्पर्धेला 'टोकियो 2020' नावानेच ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.