मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला महिनाभरापेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. अशात भारतासाठी एक वाईट बातमी आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया रशियामध्ये स्थानिक स्पर्धेदरम्यान खेळताना जखमी झाला आहे. हा भारतासाठी जबर धक्का आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पूनियाकडून पदकाची आपेक्षा केली जात आहे. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६५ किलो वजनी गटातून भारताचे नेतृत्व करणार आहे. परंतु, टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होण्याआधी तो रशियामध्ये आयोजित स्थानिक स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याच्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
पूनिया वेदनेने विव्हळला...
बजरंग पूनिया रशियातील अली एलीव या स्पर्धेत सहभागी झाला होता. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याची गाठ ए कुदेव याच्याशी झाली. बजरंगने रशियाच्या या कुस्तीपटूवर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुदेव याने बजरंगचे पाय पकडत त्याला ओढले. या झटापटीत बजरंगच्या पायाला दुखापत झाली. बजरंग वेदनेने विव्हळला आणि त्याने आपला पराभव मान्य केला. दरम्यान, बजरंगचे विव्हळने पाहून फिजिओंना तात्काळ पाचारण करण्यात आले. त्यांनी बजरंगवर उपचार केले. भारतासाठी बजरंग प्रमुख खेळाडू असून तो टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा दावेदार आहे.
बजरंग पूनियाचे प्रशिक्षक शाको बेंटिनिडिस यांनी दुखापत गंभीर नसल्याचे सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'पूनियाची दुखापत गंभीर नसून चिंता करण्याची बाब नाही. आशा आहे पूनिया टोकियो ऑलिम्पिक पूर्वी फिट होईल.'
दरम्यान, प्रशिक्षकांनी दिलेली प्रतिक्रिया काहीही असो पण टोकियो ऑलिम्पिकची तयारी पाहता, पूनियाला झालेली दुखापत भारतासाठी धक्का देणारी आहे.
हेही वाचा - तेरे साथ तिरंगा है! Tokyo Olympics साठी भारताचं जबराट थीम सॉन्ग
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेन, पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा विश्वास