मुंबई - भारतात पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या रोमांचक एनबीएच्या प्री-सीजन सामन्यात इंडियाना पेसर्सने विजय मिळवला. त्यांनी सॅक्रेमेंटो किंग्सला १३२-१३१ असे हरवले. एनएससीआय डोममध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी खुप गर्दी केली होती.
हेही वाचा - महिला हॉकी : २० व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सविताने खेळला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना
टीजे वॉरन याने इंडियाना पेसर्स संघासाठी सर्वाधिक ३० गुण मिळवले. तर, सॅक्रेमेंटो किंग्सकडून स्टार खेळाडू टिंग गार्ड बडी हील्ड याने २८ गुण कमावले. सामन्याच्या सुरुवातीला किंग्सने आक्रमकता दाखवत १७-६ ने आघाडी मिळवली होती. मात्र, पहिल्या सत्रापूर्वी पेसर्सने आपला खेळ उंचावला आणि ही पिछाडी पाच गुणांपर्यंत येऊन ठेवली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या अर्ध्यापर्यंत किंग्सने आपली आघाडी कायम ठेवली. दुसऱया सत्रात किंग्स ५३-३८ ने आघाडी टिकवली होती. मात्र, तिसऱ्या सत्राच्या शेवटी इंडियाना पेसर्सच्या खेळाडूंनी हा फरक एक गुणापर्यंत आणला. सामन्याच्या शेवटच्या सत्रात पेसर्सने किंग्ससोबत ११८-११८ अशी बरोबरी साधली. या बरोबरीमुळे सामना ओवरटाईम मध्ये पोहोचला. ओवरटाईममध्ये दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. मात्र, शेवटी इंडियाना पेसर्सने सरशी साधली.