नवी दिल्ली - 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या अभिनव बिंद्रासह इतर नेमबाजपटूंनी भारताच्या माजी नेमबाज पूर्णिमा झनाने यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पूर्णिमा यांचे कर्करोगाने निधन झाले. 42 वर्षीय पूर्णिमा यांनी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
आयएसएसएफ विश्वकरंडकासह आशियाई चॅम्पियनशिप आणि अन्य स्पर्धांमध्येही त्यांनी भारतासाठी पदके जिंकली आहेत. आपल्या कारकीर्दीच्या शेवटी, त्यांनी प्रशिक्षण सुरू केले होते. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही देण्यात आला.
जयदीप कर्माकर यांनी ट्वीट केले, "माझी जुनी मैत्रिण पूर्णिमाच्या मृत्यूची बातमी ऐकून फार वाईट वाटले. ती आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक होती. आमची मैत्री कनिष्ठ संघाच्या दिवसांपासून होती. पण आम्ही पुन्हा एकदा कुठेतरी भेटू, अशी शक्यता नाही."
जसपाल राणाने ट्विट केले की, "तुम्ही आमच्यामध्ये नाहीत, यावर विश्वास ठेवण्यास आम्ही असमर्थ आहोत. ही आमच्यासाठी दु:खदायक बातमी आहे. देव तुमच्या आत्म्यास विश्रांती देईल."
राणाच्या ट्विटवर बिंद्राने लिहिले, "पूर्णिमा, देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तुमची खूप आठवण येईल."