नवी दिल्ली - भारताचे दिग्गज माजी धावपटू आणि जग ज्यांना 'फ्लाईंग सिख' या नावाने ओळखते अशा मिल्खा सिंग यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत चार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकणार्या मिल्खा सिंग यांनी आपल्या वेगाने दुनियेला वेड लावले होते.
हेही वाचा - युवराजवर 'हा' संघ बोली लावण्यास उत्सुक !
'फ्लाईंग सिख'ची पदवी -
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला. फाळणीनंतर, मिल्खा सिंग भारतात आले. पाकिस्तानच्या अब्दुल कालिकसोबतच्या अतिशय तणावपूर्ण झालेल्या शर्यतीमध्ये मिल्खा सिंग यांनी विजय मिळवला होता. तत्कालिन पाकिस्तानचे पंतप्रधान फील्ड मार्शल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना 'द फ्लाइंग सिख' ही पदवी दिली.
रोम ऑलिम्पिकमध्ये हुकलेल्या पदकाची खंत -
जेव्हा मिल्खा सिंग यांच्या नावाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याच्या रोम ऑलिम्पिकमध्ये हुकलेल्या पदकाचादेखील उल्लेख होतो. 'मी प्रत्येक शर्यतीत एकदा मागे वळून पहायचो आणि ती माझी सवय होती. रोममध्ये मी चांगली सुरूवात केली. मात्र याही शर्यतीत मागे वळून पाहिल्याने मी पदकाला मुकलो होतो', या पदकाची खंत मिल्खा सिंग आजही व्यक्त करतात. या शर्यतीत कांस्यपदकाची वेळ ४५.५ अशी होती आणि मिल्खा सिंग यांनी ही शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली.
हवालदार विक्रम सिंग यांच्या मुलाला घेतले दत्तक -
मिल्खा सिंग यांचे वैयक्तिक जीवनही खूप प्रेरणादायी आहे. तीन मुली आणि एका मुलाचे वडील असलेल्या मिल्खा सिंग यांनी १९९९ मध्ये टायगर हिलच्या युद्धात शहीद झालेल्या हवालदार विक्रम सिंग यांचा मुलगा दत्तक घेतला. या मुलाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी मिल्खा सिंग यांनी सांभाळली आहे.