नवी दिल्ली - राष्ट्रीय डोपिंग एजन्सीच्या (नाडा) शिस्त समितीत भारतीय बॉक्सर अखिल कुमारची निवड करण्यात आली आहे. अखिलने यापूर्वी 2017 ते 2019 दरम्यान नाडामध्ये काम केले होते. जे मुद्दाम डोपिंगमध्ये गुंतलेले आहेत त्यांना माफी मिळणार नाही, असे अखिलने सांगितले.
अखिल म्हणाला, "खेळाडूंकडून झालेल्या काही चुका खूप गंभीर असतात आणि ही समिती याविषयीचे निर्णय घेईल. जे मुद्दाम डोपिंगमध्ये गुंतलेले आहेत त्यांना शिक्षा मिळायला हवी. खेळाडूंनी स्वत: ची काळजी घ्यावी असे मला वाटते."
तो पुढे म्हणाला, "खेळाची सुरुवात आरोग्यापासून होते. वाढत्या स्पर्धेमुळे दबाव वाढतो आणि या वातावरणात खेळाडू चुकीचा मार्ग निवडतात. एक खेळाडू म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. डोपिंगद्वारे आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालतो."