नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक गाजवल्यानंतर भारतीय खेळाडू आज मायदेशी परतणार आहेत. यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या एका टीमने टर्निनल 2 आणि टर्मिनल 3 ची तपासणी केली. या टर्निनलमधून भारतीय खेळाडू येणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासह खेळाडूंना घेऊन विमान येईल, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पुरूष आणि महिला हॉकी संघाने टोकियो शानदार प्रदर्शन केलं. त्यानंतर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे टर्निनल 3 वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, सीआयएसफ यांच्यासह एक श्वान पथक देखील तिथे तैनात करण्यात आलं आहे.
आयएएनएसला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, विमानतळावर गर्दी करण्याची परवानगी नाही. परंतु नागरिकांचा उत्साह पाहता विमानतळावर गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे काही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेसह दिल्ली पोलीस कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालनासंदर्भात देखील सतर्क झाले आहेत.
लोकांचा उत्साह पाहता विमानतळावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु नागरिकांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीदेखील नागरिक आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी करतील. देशाला पदक जिंकून देणाऱ्या अॅथलिटची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत, असे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एसएचओ कृष्ण कुमार यांनी सांगितलं.
विमानतळाच्या बाहेर बॅरिगेट लावण्यात येणार आहेत. यात कोणत्याही नागरिकाला खेळाडूंच्या जवळ पोहोचण्याची परवानगी नसणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, खेळाडू विमानतळाबाहेर येतील आणि बाहेर उभ्या करण्यात आलेल्या बसमधून ते तिथून बाहेर पडतील.
आज सायंकाळी हॉटेल अशोकामध्ये पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान सोहळा रंगणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्य पदकांचा समावेश आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics चा आज समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करणार बजरंग पुनिया
हेही वाचा - पॅरिस ऑलिम्पिकमधून भारोत्तोलनाला वगळणार? ऑलिम्पिक समितीला मिळाले नवे अधिकार