चेन्नई - भारतीय संघाने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर रविवारी फिडे ऑनलाइन चेस ऑलिम्पियाडच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी चीनला ४-२ अशी धूळ चारत ही फेरी गाठली आणि अंतिम-८ मध्ये प्रवेश नोंदवला.
युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि आर. प्रगणानंदाने वैयक्तिक सामन्यांत विजय मिळवला. दुसरीकडे डी. हरिका, के. हम्पी, विदित संतोष गुजराती आणि पी. हरिकृष्णा यांनी जु बेंझुन, हाव यिफान, डिंग लिरेन आणि यू यांगयी यांच्याशी झालेले सामने अनिर्णित राखले. फिडेच्या वृत्तानुसार, प्रगणानंदाने ६ सामन्यांत ६ विजय मिळवले आहेत.
भारताने पूल-एमध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांच्यामागे चीन आणि जॉर्जिया आहेत. शनिवारी त्यांना मंगोलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने दिवसाची सुरुवात जॉर्जियाला ४-२ ने हरवत केली. या विजयानंतर त्यांनी जर्मनीला ४.५-१.५ ने पराभूत केले आणि त्यानंतर चीनविरुद्ध विजय मिळवला.