दोहा - कतार येथे नुकत्याच पार पडलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेमध्ये ५८ वे स्थान राखले. तर, अमेरिकेने २९ पदकांसह प्रथम स्थान पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये भारताला एकही पदक जिंकता आले नाही. मात्र, तीन स्पर्धांमध्ये भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. इतिहासात या स्पर्धेमध्ये भारताला एकच पदक जिंकला आले आहे.
हेही वाचा - #HBD ZAK : झहीर खान झाला ४१ वर्षांचा, वडिलांनी सांगितले होते अभियांत्रिकी सोडून क्रिकेट खेळ
भारताकडून अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेज प्रकारातील अंतिम फेरीत स्थान मिळवले तर, भारताच्या ४X४०० मीटर रिले संघानेही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या दोघांनीही ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. भालाफेकीमध्ये महिला खेळाडू अन्नु रानी अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र, ती आठव्या स्थानावर राहिली.
या स्पर्धेमध्ये १४ सुवर्ण, ११ रौप्य आणि चार कांस्यपदकासह अमेरिकेने प्रथम स्थान पटकावले. त्यानंतर केनियाने पाच सुवर्णपदकांसह दुसरे तर जमैका आणि चीनने तीन सुवर्णपदकांसह तिसरे स्थान राखले आहे. या स्पर्धेत ४३ देशांनी पदके जिंकली असून एकूण ८६ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाले आहेत.