दोहा (कतार) - येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत जमैकाची धावपटू शेली अॅन फ्रेझर प्राइस हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. महत्त्वाचे म्हणजे, फ्रेझर प्राइसने या स्पर्धेच्या इतिहासात १०० मीटर स्पर्धा एकूण ४ वेळा जिंकली आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली आहे.

विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या १०० मीटर धावण्याच्या प्रकारात, यापूर्वी जमैकाचा उसेन बोल्ट, अमेरिकेचा कार्ल लुईस आणि मॉरिस ग्रीन यांनी प्रत्येकी ३-३ वेळा सुवर्णपदकं जिंकली आहेत. या दिग्गजांचा रेकॉर्ड फ्रेझर प्राइसने मोडीत काढत तब्बल ४ वेळा सुवर्णपदाकावर आपले नाव कोरले आहे.

हेही वाचा - उसेन बोल्टचा रेकॉर्ड १० महिन्यांपूर्वी आई बनलेल्या एलिसन फेलिक्सने मोडला
फ्रेझर प्राइसने १०० मीटरचे अंतर १०.७१ सेकंदामध्ये पार केले. तर ब्रिटनची डायना एशर-स्मिथने हे अंतर १०.८३ सेकंदामध्ये पूर्ण करत दुसऱ्या क्रमांक पटकावला. दरम्यान यापूर्वी ३२ वर्षीय फ्रेझर प्राइसने २००८ आणि २०१२ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिचा सध्याचा फॉर्म पाहता, पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही ती सुवर्णपदाकाची दावेदार मानली जात आहे.
हेही वाचा - विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : द्युती पहिल्या फेरीत गारद, जाबीरची 'धाव' उपांत्य फेरी संपुष्टात