नवी दिल्ली - जमैकाचा स्टार माजी धावपटू उसेन बोल्टने ट्रॅकवर परत येण्याचे संकेत दिले आहेत. माजी प्रशिक्षक ग्लेन मिल्सने इच्छा व्यक्त केल्यास मी निवृत्ती मागे घेऊ शकतो, असे बोल्ट म्हणाला. एका मुलाखतीदरम्यान बोल्टने सांगितले, की परतीचा हेतू नसला तरी प्रशिक्षक म्हणाले तर सर्व काही शक्य होईल.
33 वर्षीय बोल्ट 11 वेळा विश्वविजेता असून तो 2017 च्या लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर निवृत्त झाला. शेवटच्या स्पर्धेत बोल्टने रौप्यपदक जिंकले. बोल्ट म्हणाला, ''माझ्या प्रशिक्षकाची इच्छा असेल, तर मी त्यांना नकार देणार नाही. कारण मला माझ्या प्रशिक्षकावर खूप विश्वास आहे. सर्व काही शक्य होईल.''
ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टच्या नावावर अजूनही 100 व 200 मीटर शर्यतीचा विश्वविक्रम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016 मध्ये बोल्टने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव पुरुष धावपटू आहे.
बोल्टने 2002 मध्ये विश्व ज्युनियर चॅम्पियनशीपच्या 200 मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यावेळी तो जागतिक स्तरावरील सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्याने 2017 मध्ये निवृत्ती जाहीर केली.