नवी दिल्ली : फुटबॉल जगतातील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याच्या शाही शैलीबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्टार फुटबॉलर रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबासह सौदी अरेबियामध्ये आहे. 36 वर्षीय रोनाल्डोने अलीकडेच सौदी अरेबियाच्या अल-नासिर या क्लबसोबत करार केला आहे. या कराराद्वारे, रोनाल्डो दरवर्षी सुमारे $200 दशलक्ष कमवत आहे. सध्या रोनाल्डो रियाधमधील फाइव्ह स्टार फोर सीझन हॉटेलमध्ये कुटुंबासोबत राहत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, रोनाल्डो या हॉटेलचे महिन्याचे भाडे किती भरतो.
अडीच कोटी रुपये भाडे : क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या रियाधमधील फोर सीझन्स हॉटेलमध्ये कुटुंबासह राहत आहे. येथे राहण्यासाठी त्यांनी या हॉटेलमध्ये जवळपास 17 खोल्या बुक केल्या आहेत. या हॉटेलमध्ये रोनाल्डोच्या कुटुंबाशिवाय त्याचे कर्मचारीही राहत आहेत. त्याचबरोबर या आलिशान हॉटेलमध्ये राहण्यासाठी रोनाल्डोला महिन्याभराच्या भाड्यापोटी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. या हॉटेलचे ते महिन्याचे अडीच कोटी रुपये भाडे देतात. रोनाल्डो त्याच्या शाही जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी सौदीतील त्याच्या हॉटेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अलिशान रूम बुक : रोनाल्डोने या हॉटेलच्या दोन मजल्यांवर 17 खोल्या बुक केल्या आहेत. हे हॉटेल सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील किंगडम टॉवरमध्ये आहे. हे लक्झरी हॉटेल जगातील सर्व सुखसोयींनी सुसज्ज आहे. त्यामध्ये बनवलेल्या खोलीचे क्षेत्रफळ तीन हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. रोनाल्डोने या हॉटेलमध्ये स्वत:साठी एक मोठी अलिशान रूम बुक केली आहे, जी या ९९ मजल्यांच्या हॉटेलमध्ये सर्वात आलिशान आहे. या हॉटेलच्या किंमत त्याच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध नाही. ते खाजगीरित्या बुक करावे लागेल. पण त्यात बांधलेला छोटा प्रेसिडेन्शिअल सूट ऑनलाइन बुक करता येतो, ज्यासाठी एका रात्रीचे भाडे ३.२७ लाख रुपये द्यावे लागते.
रोनाल्डोने केले रियाध सीझन इलेव्हनचे नेतृत्व : पीएसजी विरुद्ध रियाध इलेव्हन प्रदर्शनीय सामना : पॅरिस सेंट जर्मन आणि रियाध इलेव्हन यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी आमनेसामने आले होते. लिओनेल मेस्सी पीएसजी संघाकडून खेळतो तर क्रिस्टियानो रोनाल्डोने रियाध सीझन इलेव्हनचे नेतृत्व केले. अल नासेर आणि अल हिलाल या सौदी अरेबियाच्या दोन क्लबच्या खेळाडूंनी मिळून रियाध इलेव्हन टीम बनवली गेली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोने अलीकडेच अल नासेरसोबत विक्रमी करार केला आहे.