नवी दिल्ली - कोरोना साथीनंतरची तिरंदाजी विश्वकप क्रमवारी स्पर्धा तुर्कीच्या अंटालिया येथे होईल. ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये रंगणार आहे. सध्याच्या प्रवास आणि स्पर्धेच्या निर्बंधांमुळे यंदाचा आंतरराष्ट्रीय दौरा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, ही स्पर्धा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जागतिक तिरंदाजीच्या संकेतस्थळानुसार, जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी किमान चार देशांनी या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. हा लघु कार्यक्रम वैयक्तिक स्पर्धांवर केंद्रित आहे. अंतिम सामना जागतिक तिरंदाजीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित केला जाईल.
जगातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात २ कोटी १६ हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात ७ लाख ३३ हजार ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ कोटी २८ लाख ९२ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ लाखांचा टप्पा पार केला आहे. १८ लाख ८ हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ६ लाख ६८ हजार २२० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात ४९ हजार ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.