पुणे - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेता बाला रफिक शेखला सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने चितपट केले. ज्ञानेश्वरने अवघ्या सव्वा मिनिटात बाला रफिक शेखला आस्मान दाखवले. तर दुसरीकडे अभिजित कटके अंतिम फेरीत हरला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने त्याला हरवले.
कोण आहे ज्ञानेश्वर जमदाडे -
ज्ञानेश्वर जमदाडे हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा. त्याची निवड सुशीकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेत करण्यात आली. या निवड चाचणीत माती विभाग आणि गादी विभाग व कुमार निवड चाचणीत अनेक नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला होता. यात ज्ञानेश्वर माती विभागात अव्वल ठरला.
पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत पाचव्या फेरीत बुलडाण्याच्या बाला रफिकने चांगला प्रारंभ केला. पहिल्याच मिनिटात त्याने गुण घेतला. त्यानंतर काही क्षणांनी बाला रफिकने ज्ञानेश्वरची वरून पकड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उंचपुऱ्या ज्ञानेश्वरने चपळाईने हफ्ता डाव टाकून बाला रफिकला आस्मान दाखविले आणि आपली निवड सार्थ ठरवली.
मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने आस्मान दाखवले. त्याने अभिजित कटकेला ५-२ अशा फरकाने हरवले. हर्षवर्धन सदगीर हा अर्जुनवीर काका पवारांचा पठ्ठा आहे.