टोकियो - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे, अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. पण, जपानने ऑलिम्पिक नियोजित वेळापत्रकानुसार होणार, असे म्हटलं आहे. अशातच जपानच्या ऑलिम्पिक समितीच्या उपप्रमुखांनाचाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ताशिमा याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
याविषयी ताशिमा यांनी सांगितलं की, 'मला कोरोनाची लागण झाली असून ताप आणि निमोनियाची लक्षणे आहेत. पण मी आता ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आराम करत आहे.'
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे ६ हजाराहून अधिक लोकांचा प्राण गेला आहे. जपानमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशात रविवारपर्यंत ८१४ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला. अशात ऑलिम्पिक समितीमधील उपप्रमुखास कोरोना झाल्याने, ऑलिम्पिक स्पर्धेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी, असा सल्ला दिला होता. पण जपानने ट्रम्प यांचा सल्ला धुडकावत ऑलिम्पिक वेळेनुसार होईल, असे म्हटलं आहे.
हेही वाचा - विवाहित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूचे लैंगिक शोषण, स्पर्धेला जाताना चालत्या ट्रेनमध्ये केला अत्याचार
हेही वाचा - प्रेक्षकांविना होणार टोकियो ऑलिम्पिकमधील मशाल प्रकाशोत्सव सोहळा