सोलापूर - डेक्कन क्लिफ हँगर यांच्यावतीने दरवर्षी पुणे ते गोवा ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. भारतातील अनेक सायकलपटू या त्यात सहभागी होतात. या वर्षी ही स्पर्धा सोलापूरच्या 'सत्यशील' टीमने जिंकली.
रोड अॅक्रॉस अमेरिका सायकल स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सायकलपटूंना डेक्कन क्लिफ हँगर ही स्पर्धा ३२ तासात पूर्ण करावी लागते. या स्पर्धेत पुणे ते गोवा ६४३ किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करावे लागते.
इन्स्पायर इंडिया या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यावर्षी देश-विदेशातील स्पर्धक आले होते. डॉ. सत्यजित वाघचवरे (सोलापूर), डॉ. स्मिता झांजुरणे (पुणे), डॉ. अभिजित वाघचवरे (सोलापूर), डॉ. सुरेख निकम (पुणे) या सायकलपटूंच्या 'सत्यशील' टीमने ६४३ किलोमीटरचे अंतर २७ तास ९ मिनिटात पूर्ण करून तृतीय पारितोषिक पटकावला.
सत्यशील टीमला पुण्याच्या डॉ. राहुल झांजुरणे यांनी मार्गदर्शन केले. झांजुरणे यांनी स्वतः ही सोलो स्पर्धा पाच वेळा पूर्ण केलेली आहे. सत्यशील टीमचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे हे सलग दुसरे वर्ष होते. यात त्यांच्या सहाय्यक 'क्रु'नेसुद्धा महत्त्वाची कामगिरी बजावली. क्रुपायलटला डॉ. जयदीप फरांदे, नितीन जाधव, डॉ. आनंद भन्साळी यांनी चोख कामगिरी बजावली.
रोड मॅपिंग व नेव्हिगेशनची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी मल्लिनाथ देशमुख यांनी निभावली. तर सायकपटू व क्रु सदस्यला योग्य वेळेला पाणी, इलेक्ट्रॉल व जेवण देण्याचे काम स्वाती यादव यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले.
रिले टीम व सोलो अशा दोन्ही प्रकारात घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सुरूवात पुण्यातील पिरंगुट येथून झाली. पिरंगुट येथून या स्पर्धेला सकाळी ७ वाजता सुरुवात होऊन पुढे कात्रज-खंबाटकी घाट-सातारा- निपाणी-तावंडी-वंटमुरे या घाटातून बेळगाव-दांडेली-कारवार मार्गे गोव्यातील बोगमलो बीच येथे ही स्पर्धा पूर्ण केली. यावर्षी स्पर्धेचा रूट दांडेलीच्या घनदाट जंगलातून जाणारा होता आणि धुक्याने आच्छादित रस्ता सायकलपटूंची परीक्षा पाहणाराच होता. स्पर्धेदरम्यान या टीमने 'प्लास्टिक मुक्त भारत'चा संदेश दिला.
टीमवर्क, शारीरिक क्षमता व मानसिक क्षमतेची कसोटी घेणारी व योग्य वेळेला न्यूट्रिशन घेणे हे या स्पर्धेतून शिकता आले असे डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी नमूद केले. पुढील वर्षीच्या स्पर्धेमध्ये सोलापूरमधून आणखी सायकल रायडर्स तयार होतील, असा प्रयत्न सत्यशील टीमने करायचे ठरवले आहे.