रत्नागिरी - वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रिनीटी हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे दुसरे वर्ष असून, या रॅलीत हजारोंच्या संख्येने रत्नागिरीकर सहभागी झाले होते.
'सशक्त रत्नागिरी प्रदूषणमुक्त रत्नागिरी' हे ब्रीद घेऊन हजारो रत्नागिरीकरांनी सायकल चालवली. आज (रविवार ता. ८ ) सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. आयटीआय ते भारतीय शिपयार्ड असा २४ किलोमीटरचा टप्पा या रॅलीसाठी होता. प्रथम सिनियर गटाच्या रॅलीला सुरुवात झाली.
असा होता रॅलीचा मार्ग -
मारुती मंदिर-जयस्तंभ-शनिवार आठवडा बाजार-भगवती मिरकरवाडा जंक्शन-मिरकरवडा-रेमंडस रेस्ट हाऊस-भारती शिपयार्ड आणि तिथून पुन्हा परत अशा २४ किलोमीटरचा प्रवास या रॅलीत करावयाचा होता.
निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे महत्वाचे आहे, रत्नागिरीकरांना सायकलची सवय व्हावी, त्याचबरोबर आरोग्यासाठी सायकल चालवणे खूप महत्वाचे आहे, हाच संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी 'प्रदूषणमुक्त रत्नागिरी'चे स्वप्न या रॅलीतून जपले. यावेळी वीरश्री ट्रस्टसह विविध संस्थांनी ठिकठिकाणी पाणी, एनर्जी ड्रिंक तसेच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा यांची व्यवस्था केली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निलेश शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्या हस्ते रॅलीतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले.
या ट्रस्टनीं केली मदत -
जाणीव फाऊंडेशन, मराठी पत्रकार संघ रत्नागिरी, आरंभ ग्रुप, लायनेस ग्रुप, जाणीव संघटना, राजरत्न प्रतिष्ठान, रिक्षा संघटना, मॉनस्टर ग्रुप नाशिक, तसेच विविध संघटना, अनेक व्यक्तींचे या सायकल रॅलीला सहकार्य लाभले.