नवी दिल्ली - जगभरासह देशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण अनेक खेळाडूंना झाल्याचे समोर आले. यामुळे भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने सरकारकडे एक मागणी केली आहे. त्यांनी कोरोनाची लस तयार झाली तर ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या खेळाडूंना द्या, असे म्हटले आहे.
एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी एका ॲथलेटिक्सच्या वेबिनारमध्ये बोलताना सांगितलं, की 'आम्ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या खेळाडूंना प्रथम कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात आम्ही सरकारशी चर्चा करीत आहोत. त्यांना सांगितले आहे, की ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंना ही लस आवश्यक आहे. लस आल्यानंतर ती लस पहिले घेणाऱ्यांमध्ये ऑलिम्पिकमध्ये जाणारे खेळाडूदेखील सहभागी असतील आणि यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.'
दरम्यान, दुसरीकडे भारतासह काही देश कोरोनावर लसीचे संशोधन करत आहेत. ही लस तयार झाली तर प्रथम कोरोना योद्धा आणि सैनिकांना प्राधान्याने देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची टोकियो मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 2021साली 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. पण, यावरही कोरोनाचे सावट आहे.
हेही वाचा - मराठमोळा पैलवान राहुल आवारेला कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरू