नवी दिल्ली - आजपासून (मंगळवार) भारतात सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या कुस्तीपटूंचा सहभाग नसणार आहे. कारण भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या भितीमुळे चिनी खेळाडूंचा व्हिसा नाकारला आहे. सोमवारी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती दिली.
भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक चिटणीस विनोद तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४० कुस्तीपटू दिल्लीत होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार होते. त्यासाठी चीनने तसा व्हिसा अर्जही केला होता. पण कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. यामुळे भारत सरकारने चीनच्या कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला.
'कोरोना व्हायरसचे संकट हे जागतिक स्तरावरील आहे. तेव्हा आम्हाला खेळाडूंच्या तब्येतीची खबरदारी घ्यायलाच हवी. त्यामुळे सरकारने व्हिसा नाकारल्यामागील कारण आपण सगळेच समजू शकतो', असेही तोमर म्हणाले.
व्हिसा नाकारल्याने 'वर्ल्ड युनायटेड कुस्ती' संघटनेकडून भारतावर काही कारवाई होणार का ? याविषयी विचारल्यानंतर तोमर म्हणाले, 'व्हिसा नाकारल्याबाबत आम्हाला तरी यात काहीच गैर वाटत नाही. कारण कोरोना व्हायरसमुळे चीनची परिस्थिती सध्या गंभीर आहे. चीनमध्ये परिस्थिती सामन्य असती तर भारताने व्हिसा नाकारण्याचा प्रश्नच आला नसता. जीवघेण्या व्हायरसचा मुद्दा लक्षात घेता युनायटेड कुस्तीला या निर्णयाबाबत आक्षेप नसावा. फक्त भारतातील स्पर्धेतच चीनी खेळाडूंना नाकारण्यात येत नाही तर इतर देशही चिनी अॅथलिटना व्हिसा नाकारत आहेत. आम्हाला याबाबत युनायटेड कुस्तीकडून कोणतीही सूचना आलेली नाही'.
दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. या व्हारसच्या भितीने अनेक देशांनी चिनी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले असून चीनला विमानेही पाठवली जात नाहीत.