नवी दिल्ली - प्रशिक्षक बी. सी. रमेश यांना महिला कबड्डी संघातील माजी खेळाडू उषा राणीला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक रमेश प्रो कबड्डी लीग (पीकेएल) मधील बंगाल वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालने दबंग दिल्लीला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.
हेही वाचा - IPL २०२० : शिखरच्या आयपीएल खेळण्यावरही साशंकता, दिल्लीला 'हादरा' ?
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, या घटनेची माहिती मिळाली. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्या भारतीय महिला कबड्डी संघात उषा राणीचा समावेश होता. कर्नाटक पोलिसात तिला कॉन्स्टेबल पदावर नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी ती श्री कांतीरवा स्टेडियमवर शिबिरासाठी हजर झाली होती.
'प्रशिक्षक रमेश सध्या कर्नाटक कबड्डी असोसिएशनचे सचिव आहेत. रमेश यांचा उषाशी या शिबिराच्या काही गोष्टींबद्दल वाद झाला आणि त्यांनी उषाला मारहाण केली', असे उषाचा भाऊ नवीन यांनी सांगितले आहे. दरम्यान समपांगी रामनगर पोलिसांनी चौकशीसाठी रात्री उशिरा रमेश यांना ताब्यात घेतले. उषा हिनेही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप रमेश यांनी केला आणि तिच्याविरोधात आपल्याला तक्रार दाखल करायची आहे, असेही रमेश यांनी पोलिसांना सांगितले.