न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसमुळे यंदाची शिकागो मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे. यावर्षी 11 ऑक्टोबरला ही मॅरेथॉन होणार होती. ''धावपटू, प्रेक्षक आणि स्वयंसेवकांचे आरोग्य लक्षात घेऊन शिकागो मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे'', असे या स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले.
तत्पूर्वी, 1 नोव्हेंबरला न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन देखील जूनमध्ये रद्द करण्यात आली होती. आता पुढच्या वर्षी 7 नोव्हेंबरला ही स्पर्धा होईल. इंडोनेशियाच्या बाली येथे होणारी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धाही कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन यावर्षी 30 ऑगस्ट रोजी होणार होती.
तर, यावर्षी 25 ऑक्टोबरला होणारी आयर्लंडमधील डब्लिन मॅरेथॉन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. तर, बोस्टन मॅरेथॉनही प्रथमच रद्द करण्यात आली आहे. गेल्या 124 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.
कोरोना रुग्णांनी जगात नवा विक्रम नोंदवला आहे. गेल्या 24 तासांत जगभरात 1 लाख 88 हजार 278 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजार 502 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे.