नवी दिल्ली - जागतिक रौप्यपदक विजेता अमित पांघलला कोलोन बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. पांघलने ५२ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. विशेष म्हणजे, अंतिम सामना न खेळता पांघलने सुवर्णपदक जिंकले आहे. पांघलला जर्मनीच्या अर्गिष्ठी टर्टरयाने वॉकओव्हर दिला.
हेही वाचा - अर्जेंटिनामधील स्टेडियमला मॅराडोना यांचे नाव
तर, ९१ किलो वजनी गटात बॉक्सर सतीश कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत सतीश कुमारने फ्रान्सच्या जामिली डिनी मोईनडेजला मात दिली. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली. त्यामुळे जर्मनीच्या नेल्वी टियाफैकला विजेता घोषित करण्यात आले.
महिला विभागात साक्षी आणि मनीषा आमने-सामने
महिला विभागाच्या ५७ किलो वजनी गटात साक्षी आणि मनीषा यांनी अंतिम फेरी गाठली आहे. आता हे दोन बॉक्सिंगपटू अंतिम सामन्यात आमनेसामने असतील. मनीषाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा पदकविजेत्या सोनिया लादरला ५-० असे पराभूत केले. तर साक्षीने जर्मनीच्या रमोना ग्राफचा ४-१ असा पराभव केला.
एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणारी पूजा राय मात्र नेदरलँडच्या नोचेका फोंटजिनकडून पराभूत झाली. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात मोहम्मद हसमुद्दीन आणि गौरव सोलंकी यांनाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.