मुंबई - कोरोना व्हायरसमुळे जगभरात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी दिवे लावून सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले आहे. या आवाहनावर अनेक दिग्गज व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियानेदेखील मोंदीच्या या आवाहनाला समर्थन दिले आहे.
मोदींनी येत्या ५ एप्रिलला दिवे लावून सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचे आवाहन केले. मीसुद्धा तुम्हाला हेच सांगेन, की जनता कर्फ्यूवेळी तुम्ही जी एकजूट दाखवली तीच एकजूट यावेळीही दाखवा. मी आणि माझे कुटूंब यात सहभागी होणार आहोत. तुम्हीही भाग घ्या, असे पुनियाने म्हटले. तत्पूर्वी, भारताचा टेबलटेनिसपटू हरमीत देसाई यानेही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याविषयी मत मांडले आहे.
कोरोना विरोधात लढा देताना आपली एकजूट दाखविण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, पणती, मोबाईलचा फ्लॅश लाईट, टॉर्च लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जनता कर्फ्युच्यावेळी अनेकांनी रस्त्यावर येत गर्दी केली होती. यामुळे आता तरी रस्त्यावर येऊ नका, असेही आवाहन यावेळी मोदींनी केले.