मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. ताश्कंद -उझबेकिस्तान येथे 12वी वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स चॅम्पियनशीप स्पर्धा 3 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत झाल्या. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ब्राँझ पदक पटकाविले आहे.
स्पर्धेत सहभागी देशातील एकमेव पोलीस अधिकारी होते. सुभाष पुजारी हे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे (नवी मुंबई) येथे नेमणूकीला आहेत. पुजारी यांनी 80 किलोगटासाठी भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले.
यापूर्वी इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनतर्फे 20 व 21 मार्च रोजी लुधियाना पंजाब येथे घेण्यात आलेल्या 11व्या नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये सुभाष पुजारी यांनी 80 किलोवरील वजनी गटामध्ये सुवर्णपदाक जिंकले होते. पुजारी यांनी पोलीस खात्यातील त्यांचे दैनदिन कर्तव्य सांभाळून अथक प्रयत्नाने हे यश मिळविले आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मास्टर भारत श्री 2021 किताब मिळविणारे पुजारी हे भारतातील पहिले पोलीस अधिकारी आहेत.