नवी दिल्ली - क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीने आगामी टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आज गुरूवारी 54 सदस्यीय भारतीय संघाला औपचारिक निरोप दिला. भारत 24 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये 9 खेळात भाग घेणार आहे. भारतीय संघात देवेंद्र झाझरिया (एफ -46 भाला फेक), मरियप्पन थांगवेलू (टी-63 उंच उडी) आणि विश्व चॅम्पियन संदीप चौधरी (एफ 64 भाला फेक ) सारखे दिग्गज खेळाडू आहेत. हे खेळाडू पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.
देवेंद्र झाझरिया तिसऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाच्या प्रयत्नात आहे. त्याने 2004 आणि 2016 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. मरियप्पन याने रिओमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. तो 24 ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाचा ध्वजावाहक असणार आहे. टोकियोला रवाना होणारे हे खेळाडू निरोप कार्यक्रमात व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले. कारण ते बायो बबलमध्ये आहेत.
अनुराग ठाकूर म्हणाले की, आपल्या पॅरा अॅथलिटची महत्वकांक्षा आणि आत्मविश्वास 1.3 अरब भारतीयांना प्रेरणा देतो. त्याच्या हिमतीपुढे मोठमोठी आव्हाने नतमस्तक होतात आणि ते याचे हक्कदार आहेत. आगामी स्पर्धेत आपल्या पॅरा अॅथलिटची संख्या मागील तुलनेत तीन पटीने अधिक आहे. मला त्यांच्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास आहे.
भारताने पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपलं सर्वश्रेष्ट प्रदर्शन रिओ 2016 मध्ये केलं होतं. या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदक जिंकलं होतं. दरम्यान, प्रथमच पॅरा ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. यात सात भारतीय बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेत आपल्या अभियानाला 27 ऑगस्ट रोजी करेल. या दिवशी पुरूष आणि महिला तिरंदाजांचे सामने होणार आहेत.
हेही वाचा - कास्य पदक जिंकणाऱ्या मनप्रीत सिंगने आईच्या कुशीत घेतला विसावा, फोटो होतोय व्हायरल
हेही वाचा - मला विश्वास आहे पॅरा अॅथलिट टोकियोत चांगलं प्रदर्शन करतील - अनुराग ठाकूर