मुंबई - नौदलामध्ये काम करणारे अधिकारी मदन राय यांची 12 वर्षांची मुलगी जिया राय हिने वांद्रे-वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचे 36 किलोमीटरचे अंतर पोहून एक नवा इतिहास रचला आहे. जिया राय हिने हे 36 किलोमीटरचे अंतर 8 तास 40 मिनिटात पार केले. जिया ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराबद्दल आणि ऑटिझमबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जियाने हा पोहण्याचा विक्रम केला आहे.
जियाने 17 फेब्रुवारी पहाटे 5:50 वाजता वांद्रे-वरळी सी-लिंकच्या खालून समुद्रातून पोहण्यास सुरवात केली आणि गेट वे ऑफ इंडियापर्यंतचे 36 किलोमीटरचे अंतर तिने न थांबता पूर्ण करत एक विक्रमी कामगिरी केली आहे.
जियाने आपल्या आजारावर मात करत विक्रम रचला
जियाचे वडील मदन राय हे भारतीय नौदलात अधिकारी आहेत. त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, 'जिया ही एक स्पेशल मुलगी आहे. तिला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर नावाचा आजार आहे. तिला लवकर समजत नाही. त्यामुळे तिला शिकवण खूप कठीण होतं. पण जियाने जिद्द सोडली नाही आणि जियाने हा विक्रम केला. जियाचा विक्रम या आजारावर मात करणारा विक्रम आहे आणि आज मला खरं तर खूप आनंद होत आहे.'
जियाने यापूर्वी देखील 1 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी हे 14 किलोमीटरचे अंतर 3 तास 27 मिनिटे 30 सेंकदामध्ये पार केले आहे. जिया ही सर्वात तरुण जलतरणपटू आहे जिने 14 किलोमीटरचे अंतर खुल्या पाण्यात पोहून पार केले आहे.
हेही वाचा - इंधनावरील राज्याचा कर अधिक; सरकार दिलासा देण्याच्या तयारीत?
हेही वाचा - राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांबाबत काळजी दाखवावी - मंत्री अनिल परब