मुंबई - टोकियो ऑलिम्पिकसाठी मनप्रीत सिंगकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या १६ सदस्यीय संघाची निवड मागील आठवड्यात करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी कर्णधार म्हणून कोणाचीही निवड झाली नव्हती. मात्र, अपेक्षेनुसार मनप्रीत सिंग यांच्याकडेच कर्णधारपद देण्यात आलं आहे. तसेच महिला हॉकी संघाप्रमाणे पुरुष संघासाठीही दोन उपकर्णधारांची नेमणूक करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिरेंद्र लाक्रा आणि हरमनप्रीत सिंग हे बचावपटू भारताचे उपकर्णधार असणार आहेत.
कर्णधारपदी निवड झाल्यानंतर मनप्रीतने प्रतिक्रिया दिली असून तो म्हणाला, भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणे हे माझे भाग्यच आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील काही वर्षांत आम्ही नेतृत्व करू शकतील असे बरेच खेळाडू तयार केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही ऑलिम्पिकसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतः पूर्णपणे फिट ठेवण्यात आम्हाला यश आलं आहे.
मनप्रीतच्या नेतृत्वात भारताने २०१७ मध्ये आशिया चषक, २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ मध्ये एफआयएच सिरीज यासारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८ हॉकी विश्व करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा 'अ' गटामध्ये समावेश आहे. या गटामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पहावं लागेल.
हेही वाचा - Tokyo Olympics : राणीच्या नेतृत्वातच भारतीय हॉकी संघ खेळणार
हेही वाचा - मध्य रेल्वेचा 'डंका' टोकियो ऑलम्पिकमध्ये वाजणार